प्रतिभा सगंम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक विविध रचनात्मक कामांपैकी ‘प्रतिभा संगम’ १९९६ मध्ये संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या वर्षात ‘प्रतिभा संगम’ या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला.


युवा साहित्यिकांसमोर १५ व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा चिरंजीव ग्रंथ लेखन करणारे संत ज्ञानेश्वर आदर्श आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच प्रतिभा संगमचा आकृतीबंध तयार करण्यात आला.


भौतिक जगाच्या आणि यांत्रिक वातावरणाचा परिणाम महाविद्यालयीन परिसरात व विद्यार्थ्यांच्या जीवनात देखील झाला आहे. मातृभाषेपासून त्याची नाळ तुटते काय? अशी भयावह परिस्थिती दिसू लागली आहे. तंत्रज्ञानाची भाषा इंग्रजीकडे ओढा वाढू लागला आहे. मातृभाषेचा प्रवास मृतावस्थेकडे होत असल्यास साहित्याचे काय? साहित्यानंद? साहित्यातून मिळणारी प्रेरणा? साहित्यातून येणारी सामाजिक बांधीलकी? साहित्यातून व्यापक होणारी जीवनदृष्टी? साहित्यातून येणारा परकाया अनुभव? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. सकस आणि दर्जेदार साहित्याचे वाचन होत नाही म्हणून चंगळवादी युवा पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी व सकस, दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी प्रतिभा संगम आहे. महाविद्यालयीन परिसरातील साहित्य विषयक वातावरण अस्तंगत होताना दिसून येत आहे. पुन्हा साहित्य समृद्धी व्हावी. युवा पिढी लिहिती व्हावी म्हणून ‘प्रतिभा संगम’ !


महाविद्यालयीन विद्यार्थी लिहितात पण त्यांच्या लेखनाला योग्य दिशा नसते. भरकटलेल्या लेखणीला सुयोग्य दिशा देण्यासाठी ‘प्रतिभा संगम’ !


महाविद्यालयीन विद्यार्थी लिहितात पण त्यांच्या लेखनाला प्रसिद्धी नसते. त्यांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध होत नाही. त्यांना लेखन उर्जा व प्रेरणा मिळत नाही. युवा साहित्यिकांना लेखन उर्जा, प्रेरणा व प्रसिद्धीसाठी ‘प्रतिभा संगम’ !


महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्यिकांच्या लेखन जाणीवा समृद्ध होण्यासाठी ‘प्रतिभा संगम’ ! भावी काळात दर्जेदार साहित्यिक व साहित्य-संपदा निर्मितीसाठी युवा साहित्यिकांवर साहित्य संस्कार करण्यासाठी ‘प्रतिभा संगम’ !


प्रतिभा संगमच्या प्रवासाला एक तपाहून अधिक वर्षे पूर्ण झालीत. साहित्यविश्वातील नामवंत साहित्यिक व युवा साहित्यिकांचा भरभरून प्रतिसाद प्रतिभासंगमला मिळाला. प्रतिभा संगमच्या व्यासपीठावरून पुढे गेलेले आपले अस्तित्व निर्माण करून सन्मानाने वावर करताना दिसतात. हे प्रतिभा संगमचे संचित आहे.