अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाची अनेक आघातानंतरही टिकून असलेली संस्कृती, तसेच अनेक वर्षांच्या महान परंपरा लक्षात घेता, एका महान व बलशाली राष्ट्राची निर्मिती करण्याचे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. स्वातंत्र्य संग्रामातील युवकांचा लक्षणीय सहभाग लक्षात घेता, या राष्ट्र निर्मितीच्या कार्यात युवक कायम च केंद्र स्थानी राहिला आहे. या सर्व बाबींचा विचार काही युवकांनी केला आणि त्यातून “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” या देशव्यापी चळवळीचा ९ जुलै १९४९ रोजी अधिकृत रित्या उदय झाला. भारतातील एकमेव नोंदणीकृत असलेली विद्यार्थी संघटना, जगातील सर्वाधिक सदस्य असलेली विद्यार्थी संघटना, अभाविपची अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.


राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी परिषद अव्याहतपणे कार्यरत आहे. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, बहुआयामी व सर्वस्पर्शी संघटन अभाविप ने उभे केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शिका, संघटित व्हा व संघर्ष करा” या संदेशाचे तंतोतंत पालन अभाविप चा प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. विद्यार्थ्यांच्या मध्ये मुळातच असलेल्या बंडखोर प्रवृत्तीला शैक्षणिक परिवाराच्या समन्वयातून विधायक कार्याकडे वळवण्याचे काम अभाविप करत आहे. अभाविप चा राष्ट्र सर्वप्रथम ह्या भावनेला पाठिंबा आहे, त्यामुळे च विविध कार्यक्रम, प्रकल्प, मागण्या,आयाम राष्ट्र पुनर्निर्माण या उद्दिष्ट कडेच अग्रेषित होताना दिसतात. त्यामुळेच अभाविप ला ६० वर्ष पूर्ण होताना, “अभाविप ६० वर्ष, एक आंदोलन देश के लिये” हे शीर्षक सर्वार्थाने समर्पक ठरते.


विद्यार्थी हा केवळ शैक्षणिक क्षेत्रातील भागीदार नसून, या देशाचा जबाबदार नागरिक सुध्दा आहे. या भूमिकेचा अभाविप ने कायम पुरस्कार केला आहे. या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी १९७१ साली झालेल्या अभाविप च्या राष्ट्रीय अधिवेशनात, “आजचा विद्यार्थी, आजचा नागरिक” असा उल्लेख करण्यात आला.


अभाविप ने आपल्या बहुआयामी कार्याच्या जोरावर, तसेच राष्ट्र सर्वप्रथम या तत्वाला कुठेही मुरड न घालता, अखिल भारतीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. कधी “जहा हुआ तिरंगे का अपमान, वही करेंगे तिरंगे का सम्मान” असे म्हणत काश्मीर मधील लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी देशभरातून १० हजाराच्या वर विद्यार्थी जातात, तर दुसरीकडे विकासार्थ विद्यार्थी या आयामा अंतर्गत पर्यावरण, समाज प्रबोधन असे रचनात्मक उपक्रम राबवले जातात. कधी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात देशभरातून विद्यार्थी एकत्र येतात, तर दुसरीकडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य पातळीवर चल प्रतिकृतिंचे स्पर्धा व प्रदर्शन “डिपेक्स” या नावाखाली आयोजित केले जाते.


अभाविप देशव्यापी विद्यार्थी संघटना असल्यामुळे कालसुसंगत तसेच भारताच्या महान संस्कृती तसेच इतिहासाचे शिक्षण देणारी, तसेच भारताला जगात महाशक्ती बनवण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करणारी शिक्षण नीती असावी ह्यासाठी अभाविप निरंतर विविध मार्गाने प्रयत्नशील आहे.


अशा ह्या शैक्षणिक क्षेत्रासारख्या राष्ट्राच्या उत्थानाशी सम प्रमाणात संबंधित क्षेत्रात, काम करणाऱ्या तसेच राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या आपल्या अंतिम उद्दिष्टाकडे निरंतर वाटचाल करणाऱ्या संघटनेचे “अभाविप - एक आंदोलन देश के लिये” हे शीर्षक खऱ्या अर्थाने व्यवहार्य आहे असे म्हणता येईल